मालाड पूर्व परिसरात अग्निशमन जलद प्रतिसाद वाहन हवे; स्थानिक नागरिकांची मागणी

मालाड पूर्व परिसरात अग्निशमन जलद प्रतिसाद वाहन हवे; स्थानिक नागरिकांची मागणी

मालाड पूर्व येथील आप्पापाडा परिसरात आनंद नगर, आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली होती.

रिध्देश हातिम, मुंबई

मालाड पूर्व येथील आप्पापाडा परिसरात आनंद नगर, आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. त्यात जवळपास दीड दोन हजार झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. या दुर्घटनेच्या महिनाभर आधी जामऋषी नगरमध्ये ही आग लागली होती. त्यावेळी १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. दाट लोकसंख्येच्या या परिसरात आगीसारख्या दुर्घटना घडल्या की अग्निशमन दलाचे वाहन पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे दुर्घटनेचे गांभीर्य पाहता मालाड पूर्व येथील आप्पापाडा परिसरात अग्निशमन दलाचे जलद प्रतिसाद वाहन उपलब्ध करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे. या मागणीचा प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने विचार करण्यात येत असून शारदाबाई गोविंद पवार उद्यानात जलद प्रतिसाद वाहन (क्वीक रिस्पॉन्स व्हेहिकल) उभे केले जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने लवकरच जागेची पाहणी करण्यात येणार आहे.

मालाड पूर्व परिसरात घराघरात लघु उद्योग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आग लागण्याचा धोकाही अधिक आहे. परिणामी, या परिसरात एक जलद प्रतिसाद वाहन उभे करावे, अशी मागणी येथील माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केली होती. मिश्रा यांनी याप्रकरणी पी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहिले होते. दिंडोशी मतदारसंघात गोरेगाव - मालाड पूर्व भागात एकच अग्निशमन केंद्र आहे. त्यामुळे या परिसरात आग लागल्यास वाहन पोहोचण्यास वेळ लागतो, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. तसेच शारदाबाई पवार उद्यानात जलद प्रतिसाद वाहन उभारण्याची विनंती केली होती. त्यानुसार पी उत्तर विभाग कार्यालयाने या जागेला अनुमती दर्शवली असून या जागेची व्यवहार्यता तपासण्यासाठी अग्निशमन दलाला पत्र पाठवले आहे. या पूर्ण परिसराची पाहणी झाल्यानंतर लवकरच येते जलद प्रतिसाद वाहन सुरू होण्याची शक्यता आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com