Malegaon Bomb Blast : "अन्यायाने शिक्षा सहन करावी लागली...", निर्दोष मुक्ततेनंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांची पहिली प्रतिक्रिया
2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या खटल्यात आरोपी असलेले साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय यांच्यासह सर्व सात जणांना निर्दोष ठरवण्यात आले आहे. या निकालानंतर साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "हा भगव्या संस्कृतीचा आणि हिंदुत्वाचा विजय आहे. मला अनेक वर्षे अन्यायाने शिक्षा सहन करावी लागली, पण अखेर सत्य विजयी ठरलं."
न्यायालयाचा निर्णय काय होता?
विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी निकाल देताना स्पष्ट केलं की, या प्रकरणाच्या तपासात गंभीर त्रुटी होत्या. त्यांनी सांगितले की, केवळ शंकेच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही. तसेच, स्फोटात वापरलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर असल्याचे पुरावेही निष्कर्षात्मक नव्हते.
गृह मंत्र्यांच्या विधानाशी संयोग?
निकालाच्या आदल्या दिवशीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बोलताना स्पष्ट केलं होतं की, "हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही." या विधानानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने आरोपींना निर्दोष ठरवल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
घटनेचा मागोवा
- 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील मशिदीजवळ एका मोटरसायकलमध्ये स्फोट झाला होता
- या स्फोटात 6 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते
- स्फोटानंतर साध्वी प्रज्ञा व इतरांवर UAPA, आयपीसी आणि शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले
- 17 वर्षांच्या सुनावणीनंतर 31 जुलै 2025 रोजी न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष जाहीर केले
- मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत
संपूर्ण प्रकरणावर एक नजर
या प्रकरणाची सुरुवात 'हिंदू दहशतवाद' या संकल्पनेच्या चर्चेने झाली होती. मात्र दीर्घकाळ चाललेल्या तपासात आणि साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केलं की, आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध झाले नाहीत.