Manikrao Kokate : खातेबदलानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जो निर्णय झाला, तो..."

Manikrao Kokate : खातेबदलानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जो निर्णय झाला, तो..."

माणिकराव कोकाटेंकडून कृषी मंत्रालयाचा कार्यभार काढून घेण्यात आला असून, यानंतर माणिकराव कोकाटेंनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यात मंत्रिमंडळ खातेपालटाच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालयाचा कार्यभार काढून घेण्यात आला असून, तो उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू समजले जाणारे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर कोकाटेंना आता क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय देण्यात आलं आहे. या महत्त्वाच्या बदलानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचं रमी खेळतानाचं कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यामुळे सरकारवर आणि त्यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्या घटनेनंतर विरोधकांनीही कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र तेव्हा कोकाटेंना हटवण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र आता झालेल्या खातेपालटात त्यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेण्यात आलं असून, त्यांच्या जागी दत्तात्रय भरणेंना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर कोकाटेंना मंत्रिमंडळातून बाहेर न करता दुसरे खाते देण्यात आल्याने हा निर्णय 'डॅमेज कंट्रोल'चा भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या संपूर्ण बदलावर कोकाटेंनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खातेपालटनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अत्यंत संयम राखलेला दिसून आला. “माझ्याकडून कृषी खात्याचा कार्यभार काढून घेत क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलं आहे. जो निर्णय झाला आहे, तो मला पूर्णतः मान्य आहे. दत्तात्रय भरणेंना माझ्याकडून काही मदत लागली तर मी ती नक्की करेन आणि मला त्यांची मदत लागली, तरी मी ती घेईन.”

माध्यमांनी त्यांना विचारलं, नवीन खातं मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? यावर कोकाटेंनी हलक्याफुलक्या शैलीत, चेहऱ्यावर स्मित ठेवत इंग्रजीत थेट उत्तर दिलं – “आय एम वेरी हॅपी”. या तीन शब्दांत कोकाटेंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या संपूर्ण वक्तव्यात कुठेही नाराजीचा किंवा टीकेचा सूर दिसून आला नाही. उलट त्यांनी राजकीय संयम आणि पक्षनिष्ठा जपण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झालं. खातेपालटाच्या पार्श्वभूमीवर कोकाटेंनी घेतलेली ही भूमिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com