Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना सुनावलं; बीडच्या सभेत म्हणाले; "लेकरू नोकरीपासून वंचित..."

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. परंतु, ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या भूमिकेवर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच मनोज जरांगे यांनी बीडमध्ये सभा घेऊन ओबीसींवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

एखादं लेकरू नोकरीपासून वंचित राहिलं, तर त्या लेकराची तडफड एकदा त्याला विचारून बघा. लेकरं आमची आहेत. गळ्याला फास लावून घ्यायला लागली आहेत. आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्यांना आमच्या वेदना कळणार नाहीत. तुमच्या लेकरांच्या तुम्हाला वेदना कळतात. पण मराठ्यांना तुम्ही कधीच तुमचं लेकरू म्हणून बघितलं नाही. आम्ही काय जातीवाद केला, जरा मागचे दिवस बघा. तुम्हाला आरक्षण मिळालं, तुमची जात तुम्ही मोठी केली. त्यावेळी आमचं काहीच दुखलं नाही. आम्हाला कधी वाईटही वाटलं नाही. नोकरीत तुमच्या लोकांची बढती झाली. आमच्या लोकांच्या झाल्या नाहीत. तरीही आम्हाला वाईट वाटलं नाही.

आमची लेकरं रात्रंदिवस कष्ट करून स्वत:च्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत आहेत. तुम्ही त्याला जातीयवादाची जोड देऊन अशांतता पसरवण्याचं काम करू नका. तुमच्यासोबत आम्ही कधीच बरोबरी करत नाहीत. आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत. आम्ही ओबीसीमधून मराठ्यांचं आरक्षण घेणारच. तुम्हाला तुमचा विचार बदलायचा असेल तर बदला, त्याला आम्ही काय करू शकत नाहीत. आमचं मत आम्ही बदलू शकत नाही. कारण आमच्या मराठ्यांचं हित त्या लेकरात आहे.

ओबीसी बांधवांना विनंती आहे, सत्य मान्य करा. मराठ्यांचं आरक्षण सरकारी नोंदीनुसार आहे. तुमचे नेते विनाकारण सांगतात की यात जातीयवाद आहे. मराठी आपल्यात सामील होत आहेत, अशी खोटी माहिती देत आहेत. मराठा हा ओबीसी आरक्षणात १८८४ पासून आहेत. जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी असतील, तर मराठ्यांना आरक्षणात येऊच दिलं पाहिजे. हे सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी त्यांच्या नेत्याला शिकवलं पाहिजे. सापडलेल्या नोंदी रद्द करा, असं तुम्ही म्हणत असाल, तर हे अशक्य आहे. आमच्या नोंदी कशा रद्द होतील? या बीड शहरातील माणसाच्या दोन-तीन पिढ्या मुंबईला गेल्या.

त्याचा आजोबा तिथे गेलाय आणि नातवाला माहितच नाही, बीड शहरात आपली एक एकर जमीन आहे. तो निवृत्त झाल्यावर लक्षात आलं की आता आपण गावाला जाऊ. एक एकरचा सातबारा त्याला मिळाला. त्याच्या शेजारी छगन भुजबळांसारखा एखादा ओबीसी बांधव असेल आणि तो म्हणतोय तुझं एक एकर सापडलंय पण तू या वावरात येऊ नको. एक एकर वावर कुणी सोडेल का? आमचं ते हक्काचं आहे. ते आम्ही मिळवणार आहेत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com