Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

"नुसतं उभं राहण्यात मजा नाही, पाडण्यात सुद्धा मोठा विजय आहे"; पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण कळीचा मुद्दा बनला असून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Published by :

Manoj Jarange Patil Press Conference : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण कळीचा मुद्दा बनला असून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मराठा समाज कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडला आहे. अशातच मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. जरांगे म्हणाले, नुसतं उभं राहण्यात मजा नाही, पाडण्यात सुद्धा मोठा विजय आहे. एखाद्याला निवडणुकीत असं पाडा, की त्याच्या दोन-चार पिढ्यांनी निवडणुकीचा विचारही करु नये. मराठ्यांची किती एकी आहे, हे महाराष्ट्र पाहतोय. मी समाजाला स्पष्ट सांगितलं आहे, राज्यात महायुती असो किंवा आघाडी असो, कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. कोणत्याच अपक्ष उमेदवारालाही पाठिंबा दिला नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानतो. माझ्या स्वार्थासाठी मी मायबापाशी गद्दारी करू शकत नाही. समोरच्यानेही मराठा समाजाला मायबाप मानून गद्दारी करू नये. मायबाप जनतेशी गद्दारी करणाऱ्यांनी निवडणुकीत उभं राहू नये.

मनोज जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले, मी या निवडणुकीत नाहीय. यावेळी मराठा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. ज्याला पाडायचं त्याला पाडा. मी म्हणणार नाही, याला निवडून आणा किंवा त्याला पाडा. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. जे आरक्षण राहिलंय, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली आहे, मराठा आणि कुणबी यांच्या बाजूने जो उभा राहील, त्याला मराठा समाजाने सहकार्य केलं पाहिजे. ही निवडणूक मराठा समाजाच्या हातात दिली आहे. आता समाजाचा नाईलाज झाला आहे. आमचा उमेदवारही नाही. आम्ही रिंगणातही नाही. आम्ही कुणाला पाठिंबाही दिला नाही. सगेसोयऱ्यांच्या बाजूनं जो उभा राहील, त्याला सहकार्य केलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाईफेक झालीय, त्यांनी आरोप केलाय की, मराठा समाजाने माझ्या विरोधात कटकारस्थान रचलं आहे, यावार प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, ते मी पाहिलं नाही. पण लोकशाहीत कुणीच असं करु नये. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. काही ठिकाणी त्यांचेच कार्यकर्ते विरोध करतात आणि मराठ्यांवर ढकलून देतात. तेच आरडाओरडा करतात आणि मराठ्यांना बदनाम करतात. सहानुभूती मिळवण्यासाठी ते असं काम करतात. मराठा किंवा ओबीसी, कोणत्याही जातीचा असो, असं करणं योग्य नाही.

काही लोक सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंटबाजी करतात. निवडून येण्यासाठी अनेक लोक नाटक करत आहेत. ओबीसी-मराठ्यांत वाद नाही, त्यामुळे त्यांना सहानुभूती नाही. त्यांनी केलेलं काम फेल जातं. उमेदवार असो किंवा साधा माणूस असो, दारात आल्यावर जनतेनं त्यांना हुसकावून लावू नये. काही ठिकाणी जाणूनबुजून या गोष्टी घडविल्या जातात. ओबीसींची मत मिळवण्यासाठी काही जण स्टंटबाजी करतात. बऱ्याच मतदारसंघात असे प्रयोग सुरु आहेत. माझी भूमिका रोखठोक असते. त्यांनीही स्टंट करून मराठ्यांना बदनाम केलं नाही पाहिजे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com