Manoj Jarange Patil Health Update : जरांगेंची तब्येत खालावली असून तातडीने रुग्णालयात दाखल! उद्याच्या दसरा मेळाव्याबाबत मोठी अपडेट
मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या व्हायरल तापाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तब्येतीच्या अडचणी असूनही ते उद्याच्या दसरा मेळाव्याला गैरहजर राहणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गुरुवारी नारायण गड येथे होणारा दसरा मेळावा हा राज्यातील राजकीय-सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर जरांगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा ठरणार आहे. त्यामुळे ते नेमकं काय बोलतात, कोणता पुढचा लढा उभा करतात याकडे राज्यभरातील मराठा समाज आणि राजकीय वर्तुळाचे डोळे लागलेले आहेत.
दसऱ्याच्या आदल्या दिवशीच तब्येत बिघडल्यामुळे मेळाव्यात उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतु स्वतः जरांगे पाटलांनीच स्पष्ट केलं आहे की, "आजारी असलो तरी परंपरा मोडणार नाही, अॅम्ब्युलन्समधून जावं लागलं तरी मी दसरा मेळाव्यात हजर राहीन."
राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यातच जरांगे पाटलांच्या भाषणातून पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे नारायण गडवरील हा मेळावा राज्याच्या राजकीय समीकरणांना नवा कलाटणी देणारा ठरतोय, असं स्पष्ट होत आहे.