Manoj Jarange देशमुख कुटुंबियांच्या हस्ते पाणी प्यायले
अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केलं होतं. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या हस्ते मनोज जरांगे पाणी प्यायले आहेत. २५ जानेवारी रोजी मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी पाणी प्यायल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राजकारण तापलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी आणि देशमुखांना न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीयांना एकत्र घेत राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन केलं. देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणीही त्यांनी उचलून धरली. तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी आंदोलना वेळी केली होती.
काय आहेत मनोज जरांगेंच्या मागण्या?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. जुन्याच मागण्या आम्ही नव्याने करतो असं म्हणत सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा. तातडीने हैदराबाद गॅजेट लागू करावं. शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्यावी या प्रमुख मागण्या समोर ठेवत जरांगे यांनी आंदोलन छेडलं आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे जरांगेंच्या सामुहिक उपोषणात सहभागी झाले आहेत. जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
आम्ही रात्रीपासून आंदोलनात सहभागी झालो आहोत. दादाची (मनोज जरांगे) प्रकृती खालावलेली आहे. काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असूनही बोलता आलं नाही. हातात हात घेतला फक्त. मला देखील त्यांना काल काय विनंती करावी हे कळलं नाही. मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. समाजासाठीच्या मागण्या रास्त आहेत. यासाठी दादा एक दीड वर्षापासून आंदोलन करत आहेत. त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे.