Maratha Aarakshan: मोठी बातमी, सुनावणीबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. तर दुसरीकडे महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवनियुक्त न्यायमूर्तींकडे याचिकाकर्त्यांची मागणी
मुंबई उच्चन्यायालयाच्या नवनियुक्त न्यायमूर्तींकडे याचिकाकर्त्यांच्या वतीने विनंती करण्यात आली होती. या विनंतीला न्यायमूर्तींनी मान्यता दिली आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आता सुरूवातीपासून सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठ नव्यानं सुनावणी घेण्यास तयार झाले आहे. सोबतच याचिकाकर्त्यांना याबाबत रजिस्ट्रारकडे नव्यानं अर्ज करण्याचे ही कोर्टानं निर्देश दिले आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय लांबणीवर पडणार?
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नव्याने सुनावणीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण याआधी या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. साधारण ६० टक्के सुनावणी पूर्ण झाल्याच्या मार्गावर होती. यामध्ये याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद झाला होता. तर सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. पुन्हा सुनावणी होणार असल्याने आता दोन्ही बाजूच्या सरकारी वकील आणि याचिकाकर्त्यांना नव्याने आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय येण्यास आणखी काही महिने वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.