बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क; 55 विशेष पोलीस अधिकारी तैनात
विकास माने, बीड
मराठा समाजाकडून आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज 21 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
याच अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार हिंसक घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले असून पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी थांबता येणार नाही.
मागील आंदोलनादरम्यान बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. आता याच पार्श्वभूमीवर बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत विशेष पोलीस यंत्रणा सतर्क आहे. तर हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेकडून केले जात आहे.