मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आज बीडसह, धाराशिव बंदची हाक
मराठा समाजाकडून आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज 21 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ केली जावी. हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावे. अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
बीडसह धाराशिव बंदची देखील हाक देण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने सरकारच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील व्यापारी, शाळा महाविद्यालय सर्व ठिकाणी बंद पाळण्याचं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आलं आहे.
यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील शेकडो मराठा आंदोलन आज दुपारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. आजचा हा बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयकांकडून सांगण्यात आलं. बीड जिल्हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच अनुषंगाने आज जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त असणार आहे.