ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून विविध भूमिका साकारणारे हरहुन्नरी कलाकार डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा-सात वर्षांपासून ब्रेन स्ट्रोच्या आजाराशी ते झुंज देत होते. 'वादळवाट', 'चार दिवस सासूचे', 'दामिनी' या लोकप्रिय मालिकांमधील डॉ. विलास उजवणे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यांच्या निधनाच्या बातमीचे मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. ४ एप्रिल २०२५ रोजी मीरारोड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१६ डिसेंबर १९६४ रोजी नागपूरमध्ये जन्मलेल्या डॉ. उजवणे यांनी आर्युवेद महाविद्यालयातून डॉक्टरी शिक्षण घेतले. मात्र मन रंगभूमीकडे झुकलेले असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाटक, एकांकिका यामधून अभिनयाचे बीज रोवले. नंतर पुण्यात स्थलांतर केल्यानंतर तिथे व्यावसायिक रंगभूमीवर ते काम करू लागले. 'अन्यायाला फुटले शिंग' या नाटकातून त्यांना पहिलं मोठं यश मिळालं. त्यांनी सकारात्मक भूमिकांसह खलनायिकेच्या भूमिकाही साकारल्या आहेत.