Marathi Language : शाळांमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्र गीत अनिवार्य, शिक्षण मंत्र्यांची सूचना
थोडक्यात
शाळांमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्र गीत अनिवार्य
विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणपत्रिकेवरसुद्धा मराठी हा विषय आला पाहिजे
‘एक पेड माँ के नाम' या उपक्रमाची देखील प्रभावी अंमलबजावणी करावी
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी घोषणा केली की, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये, ज्यामध्ये सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज आणि आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न शाळा समाविष्ट आहेत, या शाळांमध्ये मराठी भाषा (Marathi Language) आणि राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा' अनिवार्य केले जाईल. राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची सहविचार बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते.
शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, आयसीएसई, सीबीएसई, केंब्रिज मंडळातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणपत्रिकेवरसुद्धा मराठी हा विषय आला पाहिजे. त्यासाठी विविध मंडळांशी पत्रव्यवहार केला जाईल. राज्य मंडळाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यासंदर्भातील अभ्यासक्रमाचा आयसीएसई बोर्डाच्या पुस्तकामध्येही समावेश झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. इंटरनॅशनल बोर्डमध्ये मानव्यविद्या या विषयांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास शिकवण्याबाबतही विचार केला जावा. दिव्यांग विद्यार्थी, कमी अध्ययन क्षमता असणारे विद्यार्थी यांचाही सर्वसमावेशक शिक्षणात समावेश केला जावा. असं ते म्हणाले.
सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जावेत. अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेशाची तसेच शालेय शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत अन्य बोर्डाच्या शाळांमध्येही काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी केली जावी. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रथम ही भावना रुजवली जावी. ‘एक पेड माँ के नाम' या उपक्रमाची देखील प्रभावी अंमलबजावणी करावी. उत्तम सुविधा असणाऱ्या अन्य बोर्डाच्या शाळांनी मराठी माध्यमाच्या शाळांनाही मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या. विविध मंडळांच्या समन्वयक, प्राचार्य यांनी यावेळी त्यांच्या शाळांमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम, अध्ययन आणि अध्यापनाचे प्रयोग, मूल्यमापन पद्धती या विषयी माहिती दिली.