Uddhav Thackeray : ‘मराठी माणसा, चुकशील तर संपशील!’ उद्धव ठाकरेंच्या विधानानं राजकीय रण तापलं
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनं महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. “मराठी माणसा, चुकशील तर संपशील!” या उद्धव ठाकरेंच्या विधानानं केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे आला नाही, तर महापालिकेच्या रणधुमाळीत नवा राजकीय अजेंडा ठरल्याचंही स्पष्ट झालं आहे.
युतीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मराठी मतदारांना थेट भावनिक साद घातली. मराठी माणसाच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी एकजुटीचं आवाहन केलं. याच सुरात राज ठाकरे यांनीही “मुंबईचा महापौर मराठीच असणार” असं ठाम विधान करत मराठी मुद्द्याला पुन्हा केंद्रस्थानी आणलं. त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नव्हे, तर मराठी अस्मितेसाठीची लढाई ठरणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
विशेष म्हणजे, तब्बल पाच महिन्यांपूर्वी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले होते. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करत मराठी भाषेचा आणि अस्मितेचा प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणला. याच मुद्द्यापासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली आणि आता थेट महापालिकेआधी युतीची घोषणा करून त्यांनी मराठी मुद्द्याला अधिक धार दिली आहे.
ठाकरेंच्या या भूमिकेमुळे महायुतीतील नेते आक्रमक झाले आहेत. “मराठीसाठी ठाकरेंनी नेमकं काय केलं?” असा खोचक सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवसेनेची स्थापना मुळात मराठी माणसासाठी झाली असली, तरी भाजप–शिवसेना युतीच्या काळात मराठीपेक्षा हिंदुत्वाचा मुद्दा अधिक ठळकपणे मांडला गेला, अशी टीकाही होत आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी काही काळापूर्वी हिंदुत्वाची भूमिका घेत मराठी मुद्दा काहीसा बाजूला ठेवला होता. मात्र आता मुंबईच्या सत्तेसाठी मराठी माणसाच्या अस्तित्वाचा नारा देत ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. आता ही निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याचं चित्र आहे. मराठी मतदार या हाकेला कितपत प्रतिसाद देतो, आणि भाजप मराठी मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणतं राजकीय अस्त्र वापरते, यावरच मुंबई महापालिकेचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार, हे ठरणार आहे.
थोडक्यात
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
या युतीमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे.
उद्धव ठाकरेंच्या “मराठी माणसा, चुकशील तर संपशील!” या विधानाने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
या विधानातून मराठी अस्मितेचा मुद्दा ठळकपणे समोर आला आहे.
त्याचबरोबर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नवा राजकीय अजेंडा ठरल्याचंही स्पष्ट होत आहे.

