Auto Rickshaw Theft : मुंबईच्या कुरार परिसरात रिक्षा चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं असून पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक करत तब्बल सात चोरीच्या रिक्षा हस्तगत केल्या आहेत. मुंबईत रिक्षाचा वापर करणाऱ्यांसाठी एक गंभीर इशारा समोर आला आहे. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरीचं मोठं जाळं कार्यरत असल्याचं समोर आलं असून, या टोळीतील दोन महत्त्वाचे सदस्य एक रिक्षाचालक आणि एक मेकॅनिक पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
पोलिसांच्या तपासात उघड झालं की, आरोपी चोरी केलेल्या रिक्षांवर बनावट नंबर प्लेट लावत होते आणि त्या रिक्षा शहरात भाड्याने चालवत होते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना त्या रिक्षा चोरीच्या आहेत, याची पुसटशी कल्पनाही येत नव्हती.
गेल्या काही महिन्यांपासून कुरार परिसरात रिक्षा चोरीच्या घटना झपाट्याने वाढू लागल्या होत्या. वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे पोलीस सतर्क झाले आणि तपास सुरू केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक साधनांचा वापर करत त्यांनी अखेर दोघांना पकडण्यात यश मिळवलं.
पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडून जेव्हा चौकशी केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांच्याकडून सात चोरीच्या रिक्षा जप्त केल्या असून, त्या सर्व रिक्षा बनावट नंबर प्लेटसह रस्त्यावर चालवण्यात येत होत्या.
कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव तावडे यांनी सांगितलं की, या प्रकरणात आणखी किती लोक सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे. रिक्षाचोरीच्या घटनांवर आळा बसावा म्हणून मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. रिक्षा पकडण्यापूर्वी त्या रिक्षाचा क्रमांक आणि चालकाचा फोटो किंवा ओळखपत्र तपासणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. रिक्षाने प्रवास करताना तिचा क्रमांक लक्षात ठेवा. शक्य असल्यास चालकाचा ओळखपत्र पाहूनच प्रवास सुरू करा. अनोळखी किंवा संशयास्पद रिक्षांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात जरूर कळवा.