धनंजय मुंडे यांचा राजीनामा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
यातच संतोष देशमुखांना मारहाण करताना, त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. या फोटोत संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली हे दिसून येत आहे. या सर्व फोटो, व्हिडिओमध्ये आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण दिसत आहेत.
संतोष देशमुखांचे हे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळत असून मुख्यमंत्री फडणवीस यांची देवगिरीवर अजितदादा, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फोटो समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष, रोष लक्षात घेता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठोस निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या 2 तास चाललेल्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरच चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.