संतापजनक ! 22 दिवसीय बाळाला पोटावर गरम विळ्याचे 65 चटके, बाळाची प्रकृती गंभीर

संतापजनक ! 22 दिवसीय बाळाला पोटावर गरम विळ्याचे 65 चटके, बाळाची प्रकृती गंभीर

बाळाला चटके देण्याचा संतापजनक प्रकार समोर
Published by :
Team Lokshahi
Published on

अमरावतीमध्ये एक भयंकर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अवघ्या 22 दिवसाच्या बाळाला पोटावर तब्बल 65 वेळा चटके दिले आहेत. मेळघाट चिखलदरा तालुक्यातील सीमोरी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सगळ्या प्रकारामुळे बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला हतरु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते मात्र बाळाला आता अचलपुर येथे नेण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सीमोरी येथील रहिवासी बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकार यांना एक 22 दिवसांचे बाळ आहे. बाळ आजारी असल्याचे समजताच घरगुती उपाय म्हणून नातेवाइकांनी चिमूकल्याच्या पोटावर विळा गरम करुन 65 वेळा चटके दिले. यामुळे बाळाची तब्येत खूप बिघडली. यानंतर बाळाला लगेचच उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये आता बाळाची प्रकृती खूप नाजुक असल्याचे समोर आले आहे.

मेळघाटमधील त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला अमरावतीला आणण्यात आल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालय येथील डॉक्टरांनी दिली.बाळ 22 दिवसांचे आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले आहे. यामुळे बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात फॅसिलिटी नसल्याने त्याला नागपूरला रेफर केले जाऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या कुटुंब सदस्यांनी पोटाला चटके दिले असतील पण चटके गंभीर नसून श्वास घेता येत नाही ती मूळ समस्या आहे असेही डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान मेळघाटात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या भागात आरोग्य यंत्रणेने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र बालमृत्यू रोखण्यास आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसून आले आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2020 ते सप्टेंबर 2024 पर्यंत मेळघाटात 818 बालमृत्यू आणि 24 मातामृत्यू झाले आहेत .मेळघाटाच्या अतिदुर्गम भागातील सिमोरी गावात घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा या साऱ्या प्रकारावर लक्ष वेधले गेले आहे .

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com