Sanjay Shirsat
Sanjay Shirsat

आमदार संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले; "हे नेते शिवसेनाप्रमुखांचे पाय धरायला..."

"तुम्हाला काँग्रेसच्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चरणी लीन व्हावं लागतं. हे तुम्ही केलेलं पाप तुम्हाला फेडायची वेळ आली आहे"
Published by :

Sanjay Shirsat Press Conference : तुम्हाला काँग्रेसच्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चरणी लीन व्हावं लागतं. हे तुम्ही केलेलं पाप तुम्हाला फेडायची वेळ आली आहे. शिवसेनाप्रमुख कधीच नेत्यांच्या दरवाज्यात गेले नव्हते. हे नेते शिवसेना प्रमुखांचे पाय धरायला यायचे. आज तुम्ही त्यांचे पाय धरता, अशी संघटना पुढे नेत आहेत तुम्ही? अशा पद्धतीने संघटना पुढे जाते का? मग दुसऱ्याला नावं ठेवतात. काल आमच्या खऱ्या शिवसेनेचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात सर्व शिवसैनिक होते. शिवसेनेचे कार्यकर्ते होते. आता सर्वांना असं वाटतंय, शिवसेना प्रमुखांचे विचार आमची शिवसेना पुढं घेऊन चालली आहे. उबाठाच्या मेळाव्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असं म्हणत शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत संजय शिरसाट पुढे म्हणाले, संजय राऊत यांचा निष्ठा या शब्दाशी काहीही संबंध नाही. त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याचं कारण नाही. यांच्याकडे काहीही कारण असलं की ते म्हणतात, आम्ही कोर्टात जाणार. तुम्हाला थांबवतोय कोण? लोकसभेचे निकाल लागले की म्हणतात, आम्ही कोर्टात जाणार? विधानपरिषदेचा विषय आला की आम्ही कोर्टात जाणार. पक्षाचा काही विषय आला की आम्ही कोर्टात जाणार, तुम्ही कोर्टात जा. लोकशाहीमध्ये तुम्हाला दिलेला अधिकार आहे. याचा तुम्ही वापर करा. फक्त वल्गना करु नका. कोर्टात गेल्यावर जो निकाल येईल, तो तुम्हालाही मान्य आहे आणि आम्हालाही मान्य होईल.

नारायण राणे यांच्या मतदारसंघात ईव्हीएम हॅक झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या गोष्टींना लोकं कंटाळलेली आहेत. ते म्हणतात, आम्ही आघाडीसोबत आहोत. पण आघाडीच्या नेत्यांनी यांची साथ सोडली, तर कुणीही राहणार नाही. यांना कुणीही विचारणार नाही. हे तेव्हढच सत्य आहे. ईव्हीएम हॅक होत नसतं. सुजय विखेंनीही पराभव मान्य केलेला आहे. म्हणून ईव्हीएमबद्दलच्या शंका दूर होत आहेत. ईव्हीएम हॅक करायची लंके यांची पात्रता आहे का? ज्यांना याबाबत शंका आहे, त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून निकालाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही संजय शिरसाट म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com