Sangram Jagtap: दुपारी घराबाहेर पडणारे आमदार निवडून आणू शकत नाही, राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला भीषण पराभवाचा सामना करावा लागला. लढलेल्या १३५ जागांपैकी मनसेचा एकही जागा निवडून आणता आली नाही. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी माहिममधील सीटही निवडून आणता आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या अस्तित्वावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुंबईत आज मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशावरून उपस्थित केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुपारी घराबाहेर पडणारे आमदार निवडून आणू शकत नाही- संग्राम जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पहाटे सहा वाजता घराबाहेर असतात आणि त्यामुळे त्यांच्या कष्टाने त्यांनी आमदार निवडून आणले. परंतु जो माणूस दुपारी बारा आणि एक वाजता घराबाहेर पडत असेल तो माणूस माणसं निवडून आणूच शकत नाही अशी टीका संग्राम जगताप यांनी केली आहे.
काय म्हणाले संग्राम जगताप?
अजित पवार यांचं कर्तृत्व वेळोवेळी उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. रात्री उशिरापर्यंत प्रचारसभा करूनही ते मुक्कामाला घरी आले तरी बैठका झाल्यानंतर ते रात्री एक दीड वाजता झोपले तरी ते सकाळी ६ साडे सहा वाजता ते आवरून तयार असतात. त्यामुळे त्यांचे आमदार कष्टाने निवडून आले आहेत. दुपारी बारा आणि एक वाजता कुणी घराबाहेर पडत असेल आणि माणसांची भेट घेत असेल तर त्यांची माणसं निवडून येऊ शकत नाहीत. अजित दादा हे कर्तृत्वावान आहेत. हे महाराष्ट्राने पाहिलं असून त्यांनी स्वत: ते सिद्ध केलेलं आहे.
राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेत निवडून आलेल्या 42 आमदारावर आश्चर्य व्यक्त करत संशय व्यक्त केला होता. त्यांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला आहे.