Raj Thackeray : “आपल्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, तिकडून डोळा मारला की…”
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा 19 वा वर्धापन दिन आज राज्यभरात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने चिंचवडमधील रामकृष्ण सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज ठाकरे म्हणाले की, "20 दिवसांवर गुढी पाडव्याचा मेळावा होणार आहे. तिकडेच जर मी दांडपट्टा फिरवणार असेन तर आता मी चाकू, सुरे कशाला काढू? आज मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. महाराष्ट्राचा जो काही चिखल झालेला आहे. तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकं फोडून घेत आहेत. हे आमच्या लोकांना समजत नाही आहे."
"प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस वनवास झाला, 14 वर्षाचा झाला तिथून ते निघाले. मध्ये रावण आला सीतामाईंना घेऊन गेला. मग प्रभू रामचंद्र, लक्ष्मण शोधत होते. मग पुढे हनुमान मिळाले नंतर सेतू बांधला. सेतू बांधून ते लंकेत गेले नंतर कुंभकर्णाला मारले नंतर रावणाला मारले. रावणाला मारल्यानंतर ते सीतामाईला घेऊन ते परत अयोध्येला 14 वर्षानंतर परत आले. मध्ये त्यांनी एक तो सेतू बांधला. हे सगळं त्यांनी 14 वर्षात केलं आणि बांद्रा वरळी सिलींग हा पण 14 वर्षात बांधला. या सर्वाविषयी मी 30 तारखेला बोलणार आहे."
"कालच महिला दिन झाला. दरवर्षी 8 मार्चला आपण साजरा करतो. महिला दिन हा सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो 8 मार्चला सुरु होतो आणि पुढच्यावर्षी 7 मार्चला संपतो. आपल्याकडे दोन पुरुष आले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. अरे यात महिला कुठे आहे. मागचा पुढचा विचार नाही, बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतो पण एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय. आपण त्या व्यक्तीला विसरतोय. महिला दिन हा माँ जिजाऊ साहेबांच्या नावाने ओळखला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये इतक्या महिला होऊन गेल्या. देशामधली पहिली डॉ. महिला आनंदीबाई जोशी. सर्वात पुढारलेल्या स्त्रिया या महाराष्ट्रात मिळतील."
"आज पक्षाला 19वर्ष पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे की, यांचे आमदार येऊन गेले, खासदारकीला पराभव झाला, आमदारकीला पराभव झाला तरी या पक्षामधील माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात? आताचे जे राजकीय फेरीवाले आहे आहेत ना. असे फेरीवाले आपल्या पक्षात नाही आहेत. आज या फूटपाथवर, तिकडून कोणी डोळा मारला की त्या फूटपाथवर. असले राजकीय फेरीवाले आपल्याला उभे नाही करायचे आहेत. आपल्याला जे बांधायचे आहे, आपण खणखणीत दुकान बांधू. फेरीवाले नाही होणार. प्रत्येकाचे काम काय असणार आणि ते दर 15 दिवसांनी तपासले जाणार जर महिना - दीड महिन्यामध्ये असे जाणवले की हा पदाधिकारी कोणी का असेना जर मला त्याच्यामध्ये कामचुकारपणा दिसला तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही. त्यानंतर ज्या फूटपाथवर जायचंय त्या फूटपाथवर जाऊन बसावं त्याने."
यासोबतच राज ठाकरे पुढे म्हणाले की, "एक बैठक लावली होती मुंबईला. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर झाले नाहीत. मग हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभला गेला होतो सांगितलं. त्यांना म्हटलं मग गधड्यांनो पापं कशाला करता. आल्यावर आंघोळ केलीस का हेदेखील विचारलं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी? 2 वर्ष तोंडाला फडके बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? या देशामधली एक नदी स्वच्छ नाही. आम्ही काय नदीला माता म्हणतो. परदेशात जातो तेव्हा स्वच्छ नद्या पाहतो. ते काय तिथे माता म्हणत नाहीत, तरी नदी स्वच्छ असते. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. राज कपूर यांनी चित्रपट काढला, लोकांना वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले, अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा" असे राज ठाकरे म्हणाले.