Raj Thackeray
Raj Thackeray

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

राज ठाकरे म्हणाले, भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी ही पहिली सभा आहे. मी सरळ चालणारा आहे. मला एखादी गोष्ट पटली तर पटली, मला एखादी गोष्ट नाही पटली, तर शेवटपर्यंत नाही पटणार.
Published by :

Raj Thackeray On Uddhav Thackeray : समजा भाजपने यांना अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आश्वासन दिलं होतं, तर उद्धव ठाकरेंनी आज बोलून दाखवलं असतं का? २०१४ ते २०१९ मध्ये उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत सत्तेत बसले होते. २०१९ नंतर उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत मुख्यमंत्री होते. साडेसात वर्ष उद्धव ठाकरे भाजपसोबत होते. पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं म्हणून ही आग लागली. एखादा प्रकल्प आला की यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार त्याला पाठिंबा देणार, असं चित्र होतं. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे. स्फोट झाला तर, नुक्लियर रिअॅक्टरचा होतो आणि ते मुंबईत आहे. पण कोकणात प्रकल्प येऊन द्यायचा नाही. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार, अशी यांची भूमिका असते. या प्रकल्पांमध्ये जमिनींचा व्यवहार आहे. यांच्याच लोकांनी या जमिनी घेतल्या आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करत अप्रत्यक्षरित्या विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे कणकवलीत नारायण राणे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी ही पहिली सभा आहे. मी सरळ चालणारा आहे. मला एखादी गोष्ट पटली तर पटली, मला एखादी गोष्ट नाही पटली, तर शेवटपर्यंत नाही पटणार. २०१४ ते २०१९ दरम्यान ज्या गोष्टी नरेंद्र मोदींनी केल्या, त्या मला आवडल्या नाहीत. मी जाहीर सभेत स्क्रीनवर दाखवून त्या गोष्टींचा विरोध केला. त्या गोष्टी मला आजही पटत नाही. नोटबंदी असेल, पुतळे असतील, पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक करणारा माणूस मी आहे. किती वर्षांनंतर ३७० कलम रद्द झालं. १९४७ पासून हे कलम रद्द करण्याबाबत बोललं जात होतं, पण आता ३७० कलम रद्द केलं. आपल्या देशाच्या एका भागात एक इंच जमीन विकत घेऊ शकत नाही, असं ते कलम होतं. पण नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे हे शक्य झालं.

राज ठाकरे पुढे म्हणाले, बाबरी मशिंदींचा विषय होता, तेव्हा देशभरातून कारसेवक तिकडे गेले होते. त्यावेळी मुलायम सिंग यादवचं सरकार होतं, त्यावेळी अनेक कारसेवकांना गोळ्या घातल्या होत्या. त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिले होते. १९८८ पासून ते सुरु होतं. बाबरी मशिद पाडली गेली. नरेंद्र मोदींचं सरकार असताना राम मंदिर बांधायची कोर्टातून परवानगी मिळाली आणि आता राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापणा झाली. नरेंद्र मोदींचं सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे या कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. एकतर तुम्ही मोदींच्या बाजूने असा, किंवा मोदींच्या विरोधात बोला. पण आजच्या विरोधी पक्षांकडे त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंम्मत नाही. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोधात गेलो होतो.

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मी पाठिंबा जाहीर केला, तेव्हा फारसं मनात नव्हतं की, पुढे सभा घ्यायला लागतील. पण नारायण राणेंचा फोन आल्यावर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. नारायण राणे निवडून आलेच आहेत. त्यांना या मतदारसंघात माझी आवश्यकत नाही. या सिंधुदुर्गमधील जनता सुजाण आहे. महाराष्ट्र राज्याला ९ भारतरत्न आहेत. त्या ९ भारत रत्नापैंकी जवळपास ७ भारतरत्न हे एकट्या कोकणातील आहेत. यातील ४ भारतरत्न दापोलीतले आहेत. त्यामुळे येथील जनतेला मी सुजाण म्हटलं.

कोकणातील संपूर्ण प्रदेशात जैवविविधता आहे. अमॅझोनच्या जंगलानंतर सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा प्रदेश जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो. नारायण राणे यांनी इथे हॉटेल सुरु करा आणि इंग्लिश स्पिकींगचे क्लास लावा. राणेंना सहा महिने मुख्यमंत्री पद भेटलं, पुढचे पाच वर्ष मिळाली असती तर विकास झपाट्याने झाला असता. त्यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री सांभाळलं, ते भल्या भल्यांना जमलं नसतं. येत्या सात तारखेला नारायण राणेंना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com