MNS : "दूधानं तोंड पोळल्यानंतर आम्ही ताकही फुंकून पितो", मनसे नेत्याने सांगितला 'तो' अनुभव
गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरेबंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर दोन्ही नेत्यांच्या पक्षाकडून तसेच स्वत: उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. तसेच अनेक नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन्ही ठाकरेबंधू एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशातच मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
ते म्हणाले की, "10 वर्षांपुर्वी झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळेस मनसेला भाजपकडून युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. ही बातमी बाहेर कळताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना कॉल केला आणि आणि आपण एकत्र येण्याची भूमिका मांडली. त्यांच्या या प्रस्तावामुळे आम्ही एबी फॉर्म थांबून भाजपसोबत युती केली नाही. एवढचं नाही तर शिवसेनेचे नेते अनिल देसाई आमच्या बाळा नांदगावकरांना थांबा बोलत तात्काळ थांबवून ठेवत होते. त्यांच्यामुळे भजप आणि मनसेची युती झाली नाही आणि त्यांनी स्वतः देखील युती केली नाही. ते आमच्यासोबत चालढकलपणा करत होते. दूधानं तोंड पोळल्यानंतर आम्ही आता ताकही फुंकून पित आहोत", असं देशपांडे यांनी सांगितलं.
तसेच पुढे देशपांडे म्हणाले की, "आता शिवसेना युतीबाबत बोलत आहे, पण त्यांच्या एका फोन कॉलमुळे ठाकरे बंधूंमधील अनेक वाद सुटू शकतात. पण ते आम्हाला अडकवून ठेवत आहेत का? आमची ही शंका दुर होण्यासाठी त्यांनी तसा विश्वास निर्माण करायला हवा. संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे सातत्यानं सकारात्मक असल्याचं सांगतात. पण त्यांनी ते कृतीतून दाखवायला हवं" असं म्हणत संदीप देशपांडे यांनी 11 वर्षांपूर्वी त्यांना आणि मनसेला आलेला कटू अनुभव सांगितला.