Raj Thackeray On Central Railway Accident : 'परप्रांतीय लोढ्यांमुळेच...', मध्य रेल्वेवरील अपघातावर राज ठाकरेंचा संताप
आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सकाळच्या रेल्वे अपघाताबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रांमध्ये येणाऱ्या परप्रांतीयांवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये परप्रांतीयांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने येथील स्थानिकांना राहणे कठीण झाले आहे. त्याच प्रमाणे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आणि रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीवर गंभीर आरोप केले.
परप्रांतीयांवर हल्लाबोल :
राज ठाकरे म्हणाले, "मुंबईमध्ये दररोज रेल्वे अपघात घडतात. यामागे वाढती लोकसंख्या, रेल्वे डब्यांतील असह्य गर्दी आणि नियोजनातील मोठ्या त्रुटी कारणीभूत आहेत. मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे स्थानिक मराठी माणसाला आपल्या शहरात मोकळेपणाने वावरता येत नाही. आज स्टेशनवर किंवा रस्त्यावरची परिस्थिती पाहिली, तर कुठेही शिस्तबद्धता दिसत नाही."
"प्रत्येक स्टेशनवर वाढती गर्दी, डब्यांमधून बाहेर येणारी डोकी यातूनच अपघात होणारच. रेल्वे प्लॅटफॉर्मचे नियोजन, गर्दीवर नियंत्रण, ही सरकारची जबाबदारी आहे. पण टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का, असा प्रश्न आज निर्माण होतो," असे ते म्हणाले.
मंत्र्यांना जाब विचारावा :
ते पुढे म्हणाले की, “घटना घडली की मंत्री राजीनामा द्यावा, ही पद्धत चुकीची आहे. त्याऐवजी सामान्य जनतेने मंत्र्यांना जाब विचारायला हवा. आज आपल्या देशात माणसाच्या जीवाला किंमत उरलेली नाही, पण परदेशात नागरिकांची काळजी घेतली जाते. आपल्या नेत्यांनी परदेशातील सकारात्मक बाबी इथे आणाव्यात.”
स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन करण्याची मागणी :
राज ठाकरे यांनी मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे मंडळ किंवा स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा स्थापन करण्याची मागणीही पुन्हा एकदा लावून धरली. “मुंबईकर अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहेत, पण सरकारचे याकडे दुर्लक्ष सुरूच आहे. आता तरी सरकारने जागं व्हावं,” असे ते म्हणाले.
शेवटी, आपल्या कॉलेजच्या काळातील आठवणी सांगत राज ठाकरे म्हणाले, “पूर्वी रेल्वेने प्रवास करताना गर्दी नसायची. आज परिस्थिती इतकी वाईट आहे की, प्रवासानंतर चेहऱ्यावर हास्य नाही, थकवा आणि त्रास दिसतो. ही स्थिती बदलण्यासाठी ठोस निर्णय आणि कार्यवाही हवी.”