"...आणि मराठी म्हणून एकत्र नाही", डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट
आज सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व राजकीय नेत्यांनी अभिवादन केले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढा आणि त्याला असलेला बाबासाहेबांचा पाठिंबा याबद्दल लिहिले आहे.
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय लिहिले ?
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितलं होतं. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनलं. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे.
स्वतः बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1948 रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठींबा देणारं निवेदन दिलं होतं. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचं विस्तृत विवेचन आहे. आणि हे विवेचन Maharashtra As A Linguistic Province मध्ये वाचता येईल.
हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं की बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही.
पुढे बाबासाहेबांचं निधन झालं. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी देसाईंना जेरीस आणलं होतं. पुढे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही.
आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ?
आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम ! राज ठाकरे । राज ठाकरेंच्या या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.