Raj Thackeray : महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती निश्चित, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या थेट सूचना
MNS : राज ठाकरे यांनी अंबरनाथमधील मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. त्यांनी मतदार याद्यांची बारकाईने तपासणी करण्याचे, विधानसभेतील मतचोरीच्या आरोपांवर सजग राहण्याचे आणि पक्षात एकता राखण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यावर, राज ठाकरे अंबरनाथमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. त्यांचं मुख्य लक्ष आता मतदार याद्यांवर असलं पाहिजे, असं ते म्हणाले. विधानसभेतील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचं त्यांनी कबूल केलं आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.
राज ठाकरे सध्या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हानगरचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली. अनेकांचे असे मत आहे की निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मोठ्या प्रमाणावर धांधली केली जाते. राज ठाकरे यांनी मतदार याद्यांवर काम करण्यावर भर दिला. त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या प्रभागाच्या मतदार याद्यांचे पुनरावलोकन करावं, त्रुटी दुरुस्त कराव्या आणि शंका असलेल्या घटनांची नोंद घ्यावी.
पक्षातील एकता वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या पदाधिकाऱ्यांबद्दल कठोर भूमिका घेतली. "जे गेले ते आपले नाहीत," असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. यामुळे मनसेतील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि उत्साह वाढल्याचं दिसून आलं आहे.
राज ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्यापूर्वी शहरात असलेल्या बॅनरवर त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो दिसले. त्या बॅनरवर "महाराष्ट्रात फक्त ठाकरेच..." असं लिहिलं होतं. यावरून कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा रंगली की दसरा मेळाव्यात दोन्ही भाऊ एकत्र येणार का?
राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह संचारला. अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली. अनेकांचा असा विश्वास आहे की केवळ राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाला जाग येऊन ही कारवाई केली गेली. यावेळी त्यांनी शहराच्या स्थितीचा आढावा घेतला आणि स्वामी समर्थ चौकात मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. या वेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह दिसून आला आहे, आणि आगामी निवडणुकीसाठी पक्ष तयार असल्याचं स्पष्टपणे दिसतं.