State Commission for Men : 'महिला आयोगाप्रमाणे पुरुषांसाठीही आयोग असावा'; मनसेची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आशिष साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाप्रमाणे पुरुषांसाठीही आयोग असावा, जेणेकरून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. साबळे यांच्या म्हणण्यानुसार, अनेक पुरुष खोट्या तक्रारींमुळे मानसिक व सामाजिक त्रासाला सामोरे जात आहेत. समाजात अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, अनेक वेळा पुरुषांची बाजू ऐकून घेतली जात नाही. म्हणूनच, पुरुषांच्या न्यायासाठी स्वतंत्र आयोगाची गरज आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मनसे लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, या मागणीसंबंधी सविस्तर निवेदन सादर करणार आहे. आशिष साबळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले असून, देशात पुरुषांवर होणाऱ्या छळाचे प्रमाण 51.5 टक्के असल्याचा उल्लेख त्यांनी त्यात केला आहे.
या मागणीला समाजाकडून काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही, काही वेळा पुरुषांच्या बाजुचीही दखल घेणे आवश्यक असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.