Chandrakant Patil : 'मुंबईत मनसेला 20 जागा मिळतील' ,मंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाकीत
मुंबई महानगरपालिका निवडणुकीMNSच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागांबाबत चंद्रकांत पाटील यांनी थेट आकडेवारीच जाहीर करत भाकीत केले आहे.
सांगली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मी आकडेमोड करण्यात माहीर मानला जातो. त्यामुळे भाजपला किती जागा मिळतील हे मी सध्या सांगणार नाही. ते मी पक्षातील वरिष्ठांच्या कानात सांगीन. मात्र एवढं नक्की की, मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जेमतेम ४५ जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला २० जागा मिळतील. त्यापुढे गाडीच बंद आहे,” असे स्पष्ट भाकीत त्यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईत मराठी मतांचे विभाजन झाल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेला अपेक्षित यश मिळणार नाही, असा अप्रत्यक्ष दावा त्यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वरही खोचक टीका केली. “महापौर व्हायची स्वप्न पाहणारे ११ लोक आहेत, त्यातले एखाद-दोन जण सोडले तर बाकी सगळ्यांची स्वप्नं हवेतच राहणार आहेत,” असा टोला त्यांनी शरद पवार गटाला लगावला. यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांवरही पाटील यांनी अप्रत्यक्षपणे बोट ठेवले असल्याचे मानले जात आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून, सर्वच पक्षांनी प्रचाराची रणनीती आखली आहे. शिवसेना (ठाकरे गट) मुंबईवर आपली पकड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असताना, मनसे पुन्हा एकदा मुंबईत आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. दुसरीकडे भाजपनेही मुंबई जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या भाकीतामुळे निवडणूकपूर्व राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले असून, त्यांच्या आकडेमोडीचा अंदाज प्रत्यक्ष निकालांशी कितपत जुळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
