Devendra Fadnavis On MNS Morcha : मिरारोडमध्ये मनसेचा मराठीसाठी मोर्चा, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, "...तर ते योग्य नाही"
मीरा-भाईंदरमध्ये आज 8 जुलैला मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार होता. मात्र त्यांना मोर्च्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तसेच मनसेच्या मोर्च्यासाठी परवानगी देखील नाकारण्यात आली. त्यावरुन आता मनसे कार्यकर्ते संतापलेले पाहायला मिळत आहेत.
यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेने या नोटिशांचा तीव्र निषेध करत, पोलिसांवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या प्रयत्ननांमुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याचपार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर आपली प्रतिकिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी पोलिसांना विचारले परवानगी का दिली नाही. तर मला आयुक्त बोलले ते वेगळा रूट मागत होते. पोलिसानी त्यांना सांगितले की तुम्ही नेहमीचा रूट घ्या. पण त्यांनी रूटबद्दल पोलिसांच म्हणणं ऐकलं नाही, त्यांनी उलट उत्तर देण्यास सुरुवात केली की, आम्हाला असाच काढायचा आहे तसाच काढायचा आहे. मनसेच नाही पण कुणालाही मोर्चा काढायचा असेल तर परवानगी मिळेल".
"पण कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर कोणी जाणीवपुर्वक काम करत असेल तर ते योग्य नाही. त्यांनी काल म्हणाले की आम्हाला सभा घ्यायची आहे. ती परवानगी देखील त्यांना दिली होती. मोर्चा काढायला कुणालाही ना नाही. पोलिसांनी त्यांना सातत्याने सांगितलं की तुम्ही रूट बदला. पण त्यांनी ऐकलं नाही म्हणून आता पोलिसांनी सक्ती करण्यास सुरुवात केली आहे".