Mohan Bhagwat : 'मोदी 75 वर्षांचे होतायत, म्हणून निवृत्तीचे संकेत'; मोहन भागवतांच्या 'त्या' विधानानंतर संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतेच केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "75 वर्षांची शाल अंगावर येते, तेव्हा समजायला हवं की आता विश्रांती घ्यायची वेळ आली आहे. गौरवाला चिकटून न बसता, वेळीच बाजूला व्हावं," असं भागवतांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हटलं. त्यांच्या या विधानावर आता विविध राजकीय विश्लेषणं सुरू झाली आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधानाचा संदर्भ घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींचं वय सप्टेंबरमध्ये 75 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यांनी सत्तेची सर्व गोडी अनुभवलेली आहे. दाढी पांढरी झाली आहे, केस विरळ झालेत, जगभर दौरेही झाले. आता संघाच्या नियमानुसार त्यांनी पदमुक्त होणं आवश्यक आहे,” असं राऊत म्हणाले.
राऊतांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघाकडून पुन्हापुन्हा निवृत्तीची आठवण करून दिली जात आहे. त्यांनी असा आरोपही केला की, अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर मोदींनीच आपल्या मार्गात येणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्यांना दबावाने बाजूला केलं.
या पार्श्वभूमीवर राऊतांनी सांगितले की, त्यांनी पूर्वी एका लेखात मोदी आणि सरसंघचालक भागवत यांच्यातील एका भेटीचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये वयाच्या 75 नंतर निवृत्तीचा मुद्दा स्पष्टपणे चर्चेत आल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अलीकडेच निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती आणि अध्यात्माकडे वळण्याचा इशारा दिला होता. यावर राऊतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "प्रत्येक व्यक्तीच्या निवृत्तीबाबत वेगवेगळे विचार असतात. मात्र अशा विचारांची सुरूवात होणं हे देशासाठी चांगले लक्षण आहे."
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी भागवतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "आरएसएस आणि भाजपमध्ये अतूट संबंध आहेत. संघ जे काही म्हणतो, ते भाजपला पाळावंच लागतं. सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होतील. त्यांनी संघाच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेतायत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल."