Mohan Bhagwat : Gen Z च्या आंदोलनांवर मोहन भागवतांचं महत्वपूर्ण भाष्य
थोडक्यात
Gen Z च्या आंदोलनांवर मोहन भागवतांचं महत्वपूर्ण भाष्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 100 वर्ष पूर्ण
रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आरएसएस शताब्दी वर्ष साजरं करत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही रेशीमबागेत संघाचा विजया दशमीचा कार्यक्रम आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासमोरचे प्रश्न मांडताना विविध मुद्यांना स्पर्श केला. यावेळी शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनांवर मोहन भागवत यांनी अत्यंत महत्वपूर्ण भाष्य केलं. “आपल्याला शेजारच्या देशात गोंधळ पहायला मिळतोय. कधी कधी प्रशासन जनतेला विचारात न घेता धोरणं आखतात. त्यांच्यामध्ये असंतोष असतो, पण ते अशा पद्धतीने व्यक्त होणं योग्य नाही. इतकी हिंसा योग्य नाही. लोकशाही पद्धतीने बदल घडवता येतो” असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झालं होतं. त्यानंतर तिथे सत्तांतर झालं. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे बोलले.
“विद्यमान अर्थ प्रणालीमध्ये दोष आहेत. यामुळे श्रीमंती-गरीबी वाढते. शोषणाच नवीन तंत्र तयार होतं. आज एकटा देश आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही. आपल्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबनाला पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय जगाशी जोडणं ही मजबुरी नाही, ते आपल्या इच्छेने झालं पाहिजे” असं मोहन भागवत म्हणाले. “आज निसर्गाचा कोप वाढला आहे. आज डोंगररागांमध्ये हे दिसतय. हिमालय आपल्या सुरक्षेची भिंत आहे. आजची हिमालयाची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे. राजकीय जीवनात गोंधळ वाढलाय” असं मोहन भागवत म्हणाले.
यंदाचे मुख्य अतिथी रामनाथ कोविंद
“जागतिक व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. विनाश टाळण्यासाठी गरजेच आहे. आपण इतके पुढे गेलोय की, लगेच मागे वळलो तर गाडी पलटी होईल. आता आपल्याला हळूहळू पुढे जाऊन परतीचा मार्ग पकडावा लागेल. कुठलीही व्यवस्था बनवणारा समाज आहे” असं मोहन भागवत म्हणाले. सकाळी 7.40 च्या सुमारास रेशीम बागेत हा कार्यक्रम सुरु झाला. 21 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी आहेत. संघ प्रमुखांच्या आजच्या भाषणाकडे सगळ्या देशाच लक्ष असतं.