KKR vs PBKS, IPL 2024
KKR vs PBKS, IPL 2024

IPL Records : कोलकाता आणि पंजाबच्या सामन्यात पडला षटकारांचा पाऊस, टी-२० मध्ये 'या' ऐतिहासिक विक्रमाला घातली गवसणी

ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाताचा ८ विकेट्सने दारुण पराभव केला. विशेष म्हणजे या सामन्यात दोन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्यात आलीय.
Published by :

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगतदार सामना झाला. ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाताचा ८ विकेट्सने दारुण पराभव केला. विशेष म्हणजे या सामन्यात दोन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्यात आलीय. यामध्ये एक विक्रम असा आहे, जो आजपर्यंतच्या टी-२० इतिहासात बनला नाहीय. केकेआरने प्रथम फलंदाजी करून निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून २६१ धावांचा डोंगर रचला होता. तरीही कोलकाताला हा सामना जिंकता आला नाही. कारण पंजाब किंग्जने १८.४ षटकांमध्येच कोलकाताने दिलेलं तगडं लक्ष्य पूर्ण केलं. टी२० इतिहासातील हा सर्वात मोठा रन चेज आहे.

टी-२० च्या सर्वात जास्त षटकारांचा विक्रम मोडला

कोलकाता आणि पंजाबच्या सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकल्याचा विक्रम बनला आहे. केकेआर आणि पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी धमाका करून या सामन्यात ४२ षटकार ठोकले. टी-२० इतिहासातील आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम आहे. याआधी सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स मध्ये झालेल्या सामन्यात हा विक्रम बनला होता. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी एकूण ३८ षटकार मारले होते. तसंच आरसीबी आमि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यातही ३८ षटकार ठोकण्यात आले होते.

याशिवाय आयपीएल इतिहासातील एका इनिंगमध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम पंजाब किंग्जच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. या संघाने या सामन्यात २८ षटकार ठोकले. याआधी हा विक्रम सनरायजर्स हैदराबादच्या नावावर नोंदवण्यात आला होता. त्यांनी याच हंगामात आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात २२-२२ षटकार ठोकले होते. परंतु, आता पंजाब किंग्जचा संघाने त्यांना ओव्हरटेक केलं आहे.

या सामन्यात पंजाब किंग्जच्या जॉनी बेयरोस्टोने धडाकेबाज फलंदाजी करून शतकी खेळी केली. त्यांनी ४८ चेंडूत ८ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीनं १०८ धावांची नाबाद खेळी केली. प्रभसिमरन सिंगने २० चेंडूत ५४ धावा केल्या. तर शशांक सिंगने २८ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीनं ६८ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली आणि पंजाबला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com