Gangaram Gavankar Dead : मालवणी रंगभूमीवर शोककळा
Gangaram Gavankar Dead : मालवणी रंगभूमीवर शोककळाGangaram Gavankar Dead : मालवणी रंगभूमीवर शोककळा

Gangaram Gavankar Dead : मालवणी रंगभूमीवर शोककळा; 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर यांचे निधन

मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर व विशेषतः जागतिक पटलावर ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Gangaram Gavankar Dead News : मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर व विशेषतः जागतिक पटलावर ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर (Gangaram Gavankar) यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि दहिसर (Dahisar) येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. २९) दहिसर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गंगाराम गवाणकर हे नाव घेताच मराठी रंगभूमीवर त्यांच्या ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकाची आठवण येते. या नाटकाने मराठी रंगभूमीवर मालवणी बोलीभाषेचा एक नवा प्रवाह निर्माण केला. ‘वस्त्रहरण’मुळे केवळ मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर देश-विदेशातील रंगप्रेमींनाही मालवणी भाषेची गोडी लागली. गवाणकर यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीत ‘वात्रट मेळे’, ‘वन रूम किचन’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’ यांसारखी २० हून अधिक नाटके लिहिली. त्यांच्या नाटकांमध्ये मालवणी संस्कृतीचे रंग, स्थानिक व्यक्तिरेखांचे वास्तव चित्रण आणि उपरोधिक विनोद यांचा सुरेख संगम आढळतो.

‘वस्त्रहरण’नंतर मालवणी बोलीतील नाटकांचा एक वेगळा प्रवाह मराठी रंगभूमीवर सुरू झाला. गवाणकर यांच्या या योगदानामुळे मालवणी भाषेला स्वतंत्र ओळख आणि प्रतिष्ठा लाभली. नाटकांसोबतच त्यांनी ‘जगर’ (१९९८) या मराठी चित्रपटासाठी पटकथालेखनही केले होते. त्यांच्या लेखनात स्थानिकतेचे वैशिष्ट्य, सामाजिक भान आणि विनोदी रसिकतेची सांगड दिसून येते.

गंगाराम गवाणकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘मानाची संघटना लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ मिळाला होता. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक समर्थ आणि संवेदनशील नाटककार गमावला आहे. मालवणी संस्कृतीला शब्दबद्ध करून रंगमंचावर जिवंत ठेवणाऱ्या गवाणकर यांच्या स्मृतींना रंगभूमी जगतातून अभिवादन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com