रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील : मुकेश अंबानी

रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील : मुकेश अंबानी

व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये मुकेश अंबानी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील, असे विधान रिलायन्स इंडस्टीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केले आहे. व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये ते बोलत होते. रिलायन्सने भारतभर जागतिक दर्जाची मालमत्ता आणि क्षमता निर्माण करण्यासाठी 12 लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. गेल्या 10 वर्षांत यापैकी एक तृतीयांशहून अधिक गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये केली आहे, असेही अंबानींनी सांगितले.

मुकेश अंबानी म्हणाले की, गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे. 2030 पर्यंत गुजरातच्या उर्जेच्या निम्म्या गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करू. यासाठी आम्ही जामनगरमध्ये 5 हजार एकरवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील आणि हरित उत्पादनांचे उत्पादन शक्य होईल आणि गुजरात हरित उत्पादनांचा अग्रेसर निर्यातदार बनू शकेल. 2047 पर्यंत गुजरात 3 हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. आणि 2047 पर्यंत भारताला 35000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

गुजरात आज पूर्णपणे 5G सक्षम आहे, जे जगातील बहुतेक देशांमध्ये अद्याप नाही. यामुळे गुजरात डिजिटल डेटा प्लॅटफॉर्म आणि AI स्वीकारण्यात जागतिक आघाडीवर आहे. 5G-सक्षम, AI क्रांती गुजरातची अर्थव्यवस्था अधिक उत्पादक आणि अधिक कार्यक्षम बनवेल. लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ७ कोटी गुजरातींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रिलायन्स कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासनही मुकेश अंबानींनी दिले.

मुकेश अंबानी यांनी संबोधनाची सुरुवात 'मोदी है तो मुमकिन है' अशा शब्दांत केली. जेव्हा माझे परदेशी मित्र मला 'मोदी है तो मुमकिन है' चा अर्थ काय विचारतात, तेव्हा मी म्हणतो की भारताचे पंतप्रधान एक व्हिजन तयार करतात आणि ते अंमलात आणतात, अशक्य ते शक्य करून दाखवतात. माझे वडील धीरूभाई अंबानी मला म्हणायचे की गुजरात हे नेहमीच तुमची कर्मभूमी असेल, असेही त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com