Mumbai Dabbawala : आता तुम्हीच करा तुमच्या जेवणाची सोय; डबेवाले चालेल रजेवर
मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर लाखो मुंबईकरांची क्षुधा शांत होते, ते डबेवाले बुधवार, ९ एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत. ९ ते १४ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यातील भागातील गावांमधून येतात. त्या ठिकाणी गावा कडील ग्रामदैवत, कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे ९ ते १४ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली जाणार आहे.
मात्र, या सहा दिवसांत रविवारच्या एका सुट्टीचा समावेश आहे. तसेच महावीर जयंती, हनुमान जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती या सुट्ट्याही आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले दोन दिवस सुट्टी घेणार असून मंगळवार, १५ एप्रिलपासून ही सेवा डबेवाले पुन्हा सुरू करणार आहे. १५ एप्रिलपासून पुन्हा सकाळी डबेवाला नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर हजर होऊन आपली सेवा देईल.
उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेज, यांना सुट्टी लागली आहे तसेच सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे सेवा काही प्रमाणात कमी झाली आहे. तरीही डबेवाले सुट्टीवर गेल्याने काही ग्राहकांची गैरसोय नक्की होणार असल्याने आम्ही दिलगीरी व्यक्त करीत आहोत. ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी विनंती अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.