Mumbai Local Megablock
Mumbai Local Megablock

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, आज असेल ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी (CSMT) ते घाटकोपर (Ghatkoper) तर हार्बर मार्गावर (Harbour line) पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

मुंबई : मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तरी प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून 14 तासांचा मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मेगाब्लाक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक आज दुपारी 2 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या अप- डाऊन दोन्ही मार्गावर असेल. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून मेल- एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील सर्व अप-डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कालावधीत सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरील लोकल वळवण्यात येणार आहेत. तर भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर स्थानकातून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक

हार्बर मार्गावरील पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग वगळून) दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पनवेल स्थानकातून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी स्थानकातून पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल स्थानकातून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे स्थानकातून पनवेलसाठी जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन लोकल उपलब्ध असतील. तर बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com