Mumbai Local Train : मुंबई लोकलचे दरवाजे बंद होणार, दिवा- मुंब्रा अपघातानंतर प्रशासनाचा  निर्णय

Mumbai Local Train : मुंबई लोकलचे दरवाजे बंद होणार, दिवा- मुंब्रा अपघातानंतर प्रशासनाचा निर्णय

मुंबई लोकल: दरवाजे बंद यंत्रणा, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेचा निर्णय.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवाशांचा अपघाताने होणारा मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येथून पुढे मुंबईसाठी तयार होणाऱ्या सर्व नवीन लोकल डब्यांमध्ये दरवाजे आपोआप बंद होणारी यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

रेल्वे बोर्डाने यासंदर्भात सोमवारी अधिकृत माहिती दिली. ठाणे जिल्ह्यातील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय रेल्वे प्रशासनाच्यावतीने तातडीने घेण्यात आला आहे. आज सकळी झालेल्या रेल्वे अपघातात दोन ट्रेन एकमेकांपासून समोरून जात असताना रेकच्या पायऱ्यांवर उभे असलेले प्रवासी आदळले आणि तोल जाऊन खाली पडले. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबई लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. उघड्या दरवाज्यांमुळे अपघात घडण्याचा धोका वाढतो. ही समस्या दूर करण्यासाठी नवीन डब्यांमध्ये दरवाजे बंद करण्याची सुविधा अनिवार्य करण्यात आली आहे.

याशिवाय सध्या वापरात असलेल्या सर्व लोकल डब्यांचीही पुनर्रचना करण्यात येणार असून त्यांमध्ये देखील दरवाजे आपोआप बंद होणारी सोय उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात असून भविष्यातील अपघात कमी करण्यासाठी तो प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com