CM Devendra Fadnavis : मुंबई लोकलची मेट्रोसारखी रूपांतरणाची घोषणा, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाची ‘लाईफलाईन’ असलेल्या लोकल ट्रेनमध्ये आता ऐतिहासिक बदल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, मुंबई लोकलचे सर्व डबे येत्या काळात मेट्रोप्रमाणे पूर्णपणे वातानुकूलित (AC) असतील आणि दरवाजे स्वयंचलितरीत्या बंद-उघड होणार आहेत. या मोठ्या बदलामुळे लोकल प्रवासामध्ये सुरक्षितता आणि आरामात मोठी वाढ होणार असून, प्रवाशांना मेट्रोप्रमाणेच सुखद अनुभव देण्याची तयारी शासनाने सुरू केली आहे.
फडणवीस IIMUN आयोजित युथ कनेक्ट सत्रात बोलत होते. या कार्यक्रमात तरुणांचा शासनातील सहभाग, विकास आणि भविष्यातील प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबई लोकलबाबतच्या या महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा त्यांनी केली.
फडणवीस म्हणाले, “मुंबई लोकलमध्ये रोज जवळपास ९० लाख प्रवासी प्रवास करतात. आजही अनेक प्रवासी लटकून प्रवास करतात, त्यामुळे अपघाताचा धोका कायम असतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून लोकलचे सर्व कोच आम्ही मेट्रोसारखे करण्याचा निर्णय घेतला आहे. हे डबे पूर्णपणे एअर कंडिशन्ड असतील आणि दरवाजे स्वयंचलितरीत्या बंद राहतील. त्यामुळे सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढेल.” महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व बदल झाले तरी सेकंड क्लासच्या तिकिटाचे दर वाढवले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “एक रुपयाचाही तिकिटदर वाढणार नाही. लोकलमध्ये मेट्रोसारखा अनुभव मिळेल, पण तितक्याच दरात,” असे त्यांनी आश्वासन दिले.
मुंबई लोकलमध्ये दरवाज्यांवर लटकून प्रवास करण्याची वेळ अनेकांवर येते. प्रचंड गर्दी, प्लॅटफॉर्मवरील धक्काबुक्की, दरवाज्यांतून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची कोंडी,ही दृश्ये मुंबईकरांसाठी नवी नाहीत. या समस्यांवर उपाय म्हणून स्वयंचलित दरवाजे असलेले डबे उपयुक्त ठरणार आहेत. दरवाजे बंद असल्यामुळे गर्दी बाहेर येणार नाही आणि अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (MUTP) अंतर्गत हा बदल करण्यात येणार आहे. आधीपासूनच MUTP च्या माध्यमातून मुंबई लोकलमध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. परंतु आता करण्यात येणारा हा बदल हा लोकलच्या संपूर्ण स्वरूपात परिवर्तन घडवून आणणारा ठरणार आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, “मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाला सुरक्षित, सोयीस्कर आणि अधिक आधुनिक बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आम्हाला मेट्रोसारखीच सुंदर लोकल बनवायची आहे.” मुंबईकरांसाठी हा बदल नक्कीच महत्त्वाचा ठरणार असून, येत्या काही वर्षांत लोकल प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. मेट्रोसारख्या सोयी, बंद दरवाजे, AC सुविधा आणि त्याच तिकिटदरात हा अपग्रेड मिळणार असल्याने अनेक प्रवासी याचे स्वागत करत आहेत.

