Tata Mumbai Marathon : मुंबई धावली फिटनेसकडे! २१ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनची दिमाखदार सुरुवात
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज २१ व्या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पहाटेच्या गार वाऱ्यात आणि उत्साहपूर्ण वातावरणात या मॅरेथॉनला सुरुवात झाली असून, यंदा तब्बल ६९ हजारांहून अधिक धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक एकोपा यांचे प्रतीक ठरलेली ही मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांसाठी खास ठरली आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ ची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. सकाळी साधारण ५ वाजून ५ मिनिटांनी मॅरेथॉनला अधिकृत सुरुवात झाली. यंदा सुमारे ७० हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली होती, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आमचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांनी घेतला.
यंदाच्या मॅरेथॉनचे खास आकर्षण म्हणजे बदललेला मार्ग. मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे–वरळी सी लिंकसह प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा मॅरेथॉन मार्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे धावपटूंना समुद्रकिनाऱ्याच्या नयनरम्य दृश्यांसोबत धावण्याचा अनोखा अनुभव मिळत आहे. हा बदल मॅरेथॉनच्या इतिहासात मैलाचा दगड ठरत असल्याचे मानले जात आहे.
मुंबई मॅरेथॉनमधील हौशी मॅरेथॉनला सकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरुवात झाली. त्याच ठिकाणाहून सकाळी ६ वाजता १० किलोमीटर मॅरेथॉनला सुरुवात झाली. एलिट मॅरेथॉन सकाळी ७ वाजता सीएसएमटी येथून सुरू होऊन पुन्हा सीएसएमटी येथेच समाप्त झाली. याशिवाय दिव्यांग मॅरेथॉन (१.६ किमी), ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन (४.२ किमी) आणि ड्रीम रन (५.९ किमी) अशा विविध गटांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
हौशी धावपटूंपासून ते व्यावसायिक खेळाडूंपर्यंत सर्वांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेले मुंबईकर, ढोल-ताशांचे पथक आणि स्वयंसेवकांनी धावपटूंना प्रोत्साहन दिले. एकूणच, टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ ने पुन्हा एकदा मुंबईची ऊर्जा, शिस्त आणि फिटनेसची जाणीव अधोरेखित केली आहे.
