Sanjay Raut : ‘मुंबई लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे’,संजय राऊतांचा हल्लाबोल
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईकडे केवळ राज्याचंच नाही, तर देश-विदेशातील अनेकांचं लक्ष लागलं असल्याचा दावा करत त्यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, “मुंबईकडे आज अनेकांचे लक्ष लागले आहे. कदाचित अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही लक्ष लागले असेल. कारण मुंबई काही लोकांना त्यांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे.” या वक्तव्यातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर उद्योगपतींच्या फायद्यासाठी मुंबई विकण्याचा आरोप केला.
मतदान प्रक्रियेदरम्यान कथित राड्यांवर बोलताना राऊत म्हणाले, “आम्ही जर असे राडे केले असते, तर आमच्यावर मकोका लावला गेला असता. पण सध्या जे घडत आहे, त्यावर कारवाई का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सगळे तीन पक्ष सत्ता आणि पैशासाठी एकत्र आले असून, त्यांना मराठी माणसाचं काहीच देणंघेणं नाही, असा आरोपही त्यांनी केला. याच कारणामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भगवा स्कॉड आहे, तोही काम करेल ठोकून काढू,” असे आक्रमक विधान करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच, ही अपवादात्मक परिस्थिती फक्त मुंबईतच का निर्माण होते, नाशिक, पुणे किंवा नागपूरमध्ये का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “नागपूरलाही मागे पाडता येऊ शकते, पण तिकडे हे प्रकार का होत नाहीत?” असा टोला त्यांनी लगावला.
मतदान टक्केवारीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “आम्ही खात्रीने सांगतो, मतदानाचा टक्का घसरणार नाही. मतदारांना आवाहन करण्याची गरज नाही. लोकांनी आधीच ठरवले आहे.” गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंनी वातावरण निर्मिती केली असून, यावेळी मतदार अधिक जागरूक आणि सावध होऊन मतदान करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धार्मिक मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मुंबादेवीचा उल्लेख करत म्हटले, “तुम्ही आशीर्वाद घ्यायला कुठे जाता? तुमचं दैवत वेगळं आहे का? मुंबादेवी ही मराठी माणसाची आहे, म्हणूनच आम्ही या शहराचं नाव मुंबई ठेवलं.” नवी मुंबईपासून मुंबईपर्यंत हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “आजचा मतदार शिवसेनेचा २४ तास आणि महापौरासाठी मतदान करणार आहे,” असा ठाम दावा त्यांनी केला.
