मुंबईकरांनो काळजी घ्या! प्रदूषणामुळे मुंबईतील हवा 'विषारी'
राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. शहरातील हवा विषारी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून प्रदूषणामुळे श्वसन आणि दम्याचे रुग्ण 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील वातावरण सतत बिघडत आहे. मान्सून संपल्यानंतर शहरातील हवेचा दर्जा ‘चांगल्या’वरून ‘मध्यम’ श्रेणीपर्यंत पोहोचला आहे. काही भागात हवेची गुणवत्ता ‘खराब’वरून ‘अत्यंत खराब’ श्रेणीत गेली आहे. संपूर्ण शहराची हवा मध्यम दर्जाची असली, तरी कुलाबा, माझगाव, मालाड, चेंबूर आणि बीकेसी या भागातील हवेची वाईट दर्जाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम 10 ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी समोर आली आहे.