Pravin Darekar : 'मुंबईकर महायुतीच्या पाठीशी'; प्रवीण दरेकरांचा दावा

Pravin Darekar : 'मुंबईकर महायुतीच्या पाठीशी'; प्रवीण दरेकरांचा दावा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महायुतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मुंबईतील बदल घडवू पाहणाऱ्या नागरिकांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगत, सध्या शहरात तसाच सकारात्मक माहोल दिसत असल्याचा दावा दरेकर यांनी केला.

प्रवीण दरेकर म्हणाले की, “मुंबईकरांना बदल हवा आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या अनेक समस्या प्रलंबित राहिल्या असून, त्या सोडवण्यासाठी सक्षम आणि स्थिर नेतृत्वाची आवश्यकता आहे. मुंबई बदलणाऱ्या लोकांच्या मागे उभे राहायला पाहिजे आणि सध्या मला तसाच वातावरण शहरात दिसत आहे.” भगवा गार्ड आणि निवडणूक काळातील गोंधळावर भाष्य करताना दरेकर यांनी तीव्र टीका केली. “अख्खी निवडणूक काही लोकांनी फक्त टीका, आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळ घालण्यात घालवली आहे. हे सगळं केवळ स्टंटबाजी आहे. मुंबईकरांना हे अजिबात नको आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मुंबईकर शांतता, विकास आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देतात. त्यामुळेच या निवडणुकीत मुंबईकरांचा स्पष्ट कल महायुतीकडे असल्याचे चित्र दिसून येत आहे. “मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत,” असा दावा दरेकर यांनी केला. आगामी निकालांबाबत अंदाज व्यक्त करताना प्रवीण दरेकर यांनी महायुतीला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. “या निवडणुकीत भाजप १०० चा आकडा पार करणार असून, एकनाथ शिंदे गट ५० पेक्षा अधिक जागा जिंकेल. त्यामुळे मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार, याबाबत कुठलीही शंका नाही,” असे ते ठामपणे म्हणाले.

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था असून, तिच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि घरांच्या प्रश्नांवर प्रभावी निर्णय घेता येतात. महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा विकास अधिक वेगाने साधता येईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्व पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. मात्र, अंतिम निर्णय मतदारांच्या हातात असून, मुंबईकर कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com