BMC Election : मुंबईतील प्रभाग आरक्षणावर  महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार

BMC Election : मुंबईतील प्रभाग आरक्षणावर महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 129 हरकती सूचना आल्या आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 129 हरकती सूचना आल्या आहेत. त्यानुसार आता त्यावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी योग्य निर्णय घेणार आहेत. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण (BMC Ward Reservation) विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यावर 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रभाग आरक्षणावर एकूण 129 हरकती सूचना आल्या आहेत.

आयुक्त अंतिम निर्णय घेणार

या हरकती सूचनांवर महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे 21 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत सदर हरकती आणि सूचना यांवर योग्य तो निर्णय घेतील. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मागील 11 नोव्हेंबर रोजी 227 पैकी एसटी, एससी, ओबीसी, महिला वर्ग तसेच खुला प्रवर्ग याकरता आरक्षण सोडत काढण्यात आले होते. त्यामध्ये, 227 जागांमधून एसटी - 2 , एससी - 15 , ओबीसी - 61 , महिलांसाठी 114 जागांसाठी काढण्यात आलेली सोडत जाहीर करण्यात आली होती.

प्रारुप यादी सदोष असल्याचा आरोप

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या महापालिकेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. पण या मतदार यादीत घोळ आहे असा थेट आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. विधानसभेला ज्या मतदार यादीत नावे होती ती नावे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्याच मतदार यादीत गेली आहेत. अनेक ठिकाणी नावे वेगवेगळ्या यादीत टाकण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव वेगळ्या मतदार यादीत आहे, तर ते राहात असलेल्या इमरतीतील मतदारांची नावं वेगळ्या मतदार यादीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे. ठाकरेच्या शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख हे या याद्यांची तपासणी करत आहेत. प्रारुप मतदार यादीतील हा घोळ घेऊन, या त्रुटी असलेल्या मतदार याद्यांचे गठ्ठे घेऊन लवकरच आदित्य ठाकरे निवडणूक आयोगाकडे पुढील आठवड्यात जाणार आहेत.

मुंबईमध्ये मतदार वाढले

मुंबई आणि ठाण्यासह आसपासच्या महानगरांमधल्या मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं मतदारांची वाढलेली संख्या आगामी महापालिका निवडणुकीत नेमकी कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न आहे. मुंबई आणि ठाण्यासह विविध महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयाद्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत मुंबईत यंदा 11 लाख 80 हजार 191 मतदारांची वाढ झाली आहे. ठाण्यात मतदारांची संख्या चार लाख 21 हजार 261 इतकी वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com