Municipal Election 2026
Municipal Election 2026Municipal Election 2026

Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीआधी मोठी फाटाफूट; महायुतीचा फॉर्म्युला फसला?

राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षांमध्ये धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Municipal Election 2026 : राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षांमध्ये धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. काही जणांना उमेदवारी मिळाल्याने उत्साहाचे वातावरण असले, तरी अनेक जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिकीट नाकारल्यामुळे नाराज झाले आहेत. अनेक ठिकाणी दीर्घकाळ पक्षासाठी काम केलेल्यांना बाजूला ठेवण्यात आल्याची भावना असून, अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना संधी दिल्याने अंतर्गत असंतोष वाढला आहे.

भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून मतभेद

महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. काही शहरांमध्ये भाजपला अपेक्षित संधी न मिळाल्याने पक्षाने कठोर भूमिका घेतली, तर काही ठिकाणी शिंदे गटाने युतीस नकार दिला. स्थानिक परिस्थिती आणि राजकीय समीकरणे पाहता दोन्ही पक्षांनी काही महानगरपालिकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण १४ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती तुटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या शहरांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी चुरशीच्या आणि बहुपक्षीय लढती होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि ठाण्यात युती कायम

दुसरीकडे, मुंबई आणि ठाणे या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या ठिकाणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला युतीत सामावून घेतलेले नाही. त्यामुळे या दोन शहरांतील राजकीय गणिते वेगळी दिसून येणार आहेत.

मतदान आणि निकालाची तारीख

राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांकडे सर्व पक्ष प्रतिष्ठेच्या लढती म्हणून पाहत आहेत. युती टिकलेल्या आणि तुटलेल्या दोन्ही ठिकाणी मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

• महानगरपालिका निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग
• आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; पक्षांमध्ये धावपळ
• उमेदवारी मिळालेल्यांमध्ये उत्साह, तर अनेक जुने कार्यकर्ते नाराज
• तिकीट नाकारल्याने पदाधिकारी आणि निष्ठावंतांमध्ये असंतोष
• नव्याने पक्षात आलेल्यांना संधी दिल्याने अंतर्गत नाराजी वाढली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com