Municipal Corporation Election : राज्यात महापालिका निवडणुका जाहीर, ओबीसींसाठी किती जागा?
राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा या पत्रकार परिषदमध्ये करण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांचा यामध्ये समावेश असून, ही निवडणूक एकूण 2869 जांगासाठी असणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीनं आजपासून या महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महापालिका निवडणुकीसाठी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर आपले अर्ज 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार आहे, तर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी निवडणूक आयोगानं केली आहे, त्यानुसार 2869 जांगासाठी ही निवडणूक होणार आहे. 2869 जागांपैकी 1 हजार 442 जागा या महिलांसाठी राखीव आहेत, तर 341 जागा या एससीसाठी राखीव असून, एसटीसाठी 77 जागा राखीव आहेत. तर ओबीसींसाठी 759 जागा राखीव आहेत.
कोणत्या महापालिकांचा समावेश?
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मिरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी महापालिकांची निवडणूक होणार आहे.
