MunicipalElection : महापालिका निवडणूक, सीसीटीव्ही, ड्रोन आणि हजारो पोलीस रस्त्यावर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मुंबईत १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपायुक्त (DCP) आणि ८४ सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) तैनात असणार आहेत. यासोबतच ३,००० हून अधिक पोलीस अधिकारी आणि तब्बल २५,००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी व होमगार्ड्स रस्त्यावर असणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे सतत नजर ठेवली जाणार आहे.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. शहरातील संवेदनशील भागांत मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये १०० पेक्षा अधिक कर्मचारी, २५ अधिकारी, एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते. मतदानाच्या दिवशी सुरक्षेचे उपाय आणखी कडक करण्यात येणार आहेत.
नागपूर महानगरपालिका
नागपूरमध्ये १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. शहरातील ३,००४ मतदान केंद्रांपैकी ३२१ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि विशेष पथके तैनात असणार आहेत. या निवडणुकीसाठी १६ हजार अधिकारी-कर्मचारी आणि ५ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
अमरावती महानगरपालिका
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिन्स कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आल्या आहेत. शहरात २,००० हून अधिक पोलीस व होमगार्ड्स तैनात असणार असून, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
परभणी महानगरपालिका
परभणी शहरात निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विविध भागांत रूट मार्च काढण्यात आले असून, नानलपेठ पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवली आहे. या निवडणुकीसाठी ४ पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ७० पोलीस अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही व्हॅन आणि ड्रोन पेट्रोलिंगही सुरू आहे.
नाशिक महानगरपालिका
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ५,००० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, अंमलदार, विशेष पथके आणि होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. शहरात १० निवडणूक निर्णय अधिकारी, ४ पोलीस उपायुक्त, ६ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि १४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त फौजफाट्यासह सज्ज असणार आहेत.
नांदेड महानगरपालिका
नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पॉलिटेक्निक कॉलेज येथून मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशिन्स व मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्ह्याबाहेरून १,४८१ अतिरिक्त पोलीस मागवण्यात आले असून, एसआरपीएफच्या तुकड्यांसह एकूण ३,००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी शहरात तैनात आहेत.
मालेगाव महानगरपालिका
मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११० पोलीस अधिकारी आणि २,००० पेक्षा जास्त कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या आणि २ दंगल नियंत्रण पथके देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरली असून, मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
