माती वाचवण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये जनजागृती

माती वाचवण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये जनजागृती

"माती वाचवा, जीवन वाचवा" आणि "माती नाही, अन्न नाही" अशा घोषणा देत जनजागृती

पिंपरी चिंचवड आणि नागपूरमध्ये रविवारी माती वाचण्याच्यासाठी ‘माती वाचवा’ संदेश देत स्वयंसेवकांकडून जनजागृती करण्यात आली. ४५ हून अधिक ‘माती वाचवा’ स्वयंसेवक, श्री मोरया गोसावी गणपती मंदिर, चिंचवड गाव, लिंक रोड, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चाफेकर चौक आणि मोरया गोसावी गार्डन अशा पिंपरी- चिंचवड येथील भागात जगभरातील माती झपाट्याने नष्ट होण्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करताना दिसले. सोबतच त्याच दिवशी नागपूरमध्ये ४५ सेव्ह सॉईल स्वयंसेवक नागपुरातील प्रसिद्ध ठिकाणी पदयात्रेत सद्गुरूंनी सुरू केलेल्या जागतिक मोहिमेचा संदेश देणारे पॅम्प्लेटचे वाटप केले. त्यावेळी ‘माती वाचवा’ चा संदेश देणारे झेंडे आणि पॅम्प्लेट देऊन, तसेच "माती वाचवा, जीवन वाचवा" आणि "माती नाही, अन्न नाही" अशा घोषणा देत त्यांनी जनजागृती केली.

सद्गुरूंनी जगभरातील मातीच्या स्थितीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या जागतिक मोहिमेला ८० हून अधिक देशांच्या नेत्यांनी मान्यता दिली आहे आणि आपापल्या देशातील माती वाचवण्यासाठी पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे.

कॉर्पोरेट्स, राजकारणी, विद्यार्थी आणि शेतकरी अशा सर्व वर्गातील लोकांमध्ये जागरुकता आणणे आणि मातीच्या आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवनशैलीला समर्थन देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या शाश्वत शेती पद्धती आणण्यासाठी एकजुटीने काम करणे हे या मोहिमेचे ध्येय आहे. माती हे लाखो सूक्ष्मजीवांचे निवासस्थान आहे. या सूक्ष्मजीवांमुळेच आपण शेतात पिकवत असलेल्या आणि खात असलेल्या अन्नामध्ये पोषक घटकांची गुणवत्ता सुधारते.

या वर्षी मार्चमध्ये, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक असलेल्या सद्गुरूंनी त्यांचा १०० दिवसांचा मातीसाठीचा मोटारसायकल प्रवास सोलो रायडर म्हणून सुरू केला. हा प्रवास लंडनपासून सुरू झाला आणि तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे संपला. या वेळी त्यांनी युरोप, मध्य आशिया आणि मध्य पूर्वेतील २७ राष्ट्रे आणि भारतातील १० राज्यांमधून प्रवास केला. नुकतेच सामील झालेल्या नेपाळसह ८० हून अधिक देशांनी या जागतिक कार्याला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. गेल्या महिन्यात गोवा सरकारने आणि या पूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या इतर भारतीय राज्यांनी माती वाचण्यासाठी ईशा आउटरीचसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या वर्षाच्या सुरुवातीला, १०० दिवसांच्या जागतिक मोहिमेदरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील स्थानिक स्वयंसेवकांनी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरांसह अनेक माती वाचवा वॉकथॉन्स (पदयात्रा), जिग्स, हिप हॉप डान्स आयोजित केले आहेत. शाळा, महाविद्यालय आणि कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये खाजगी कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मातीच्या खालावलेल्या स्थितीबद्दल ‘माती वाचवा’ चे स्वयंसेवक जागरूक करत आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com