Nagpur Violence: नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 50 जणांना घेतलं ताब्यात
नागपूरमध्ये दोन गटात मोठा तणाव झाला. दोन गट समोरासमोर आल्याने नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून 2 गटात दगडफेक झाली. यामध्ये काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल असून पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आले आहे. सध्या तणावपूर्ण स्थिती आहे.
यातच महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 50 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपीलनगर या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.