Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

गृहमंत्री फडणवीसांची पोलीस दलावर पकड नाही; गुन्हेगारांची हिम्मत वाढली - नाना पटोले

काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे.

काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. पटोले पुढे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच खुलेआम दादागिरी करत आहेत, हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते, गोळीबार केला जातो पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतल्या आहेत. लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमासाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनीधींनी काम कसे करायचे ? पोलीस दल व इतर सरकारी यंत्रणा काय फक्त विरोधी पक्षांच्या नेते व लोकप्रतिनीधींवर कारवाई करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत आहे का ? एका महिला लोकप्रतिनिधीवर हल्ला झाला तरी राज्याच्या गृहमंत्र्याची एका वाक्याची प्रतिक्रियाही आली नाही हे असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे.

आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा गावात हल्ला करण्यात आला. दोन दिवसाआधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौ-यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. असे प्रकार वाढत असून गुन्हेगारांवर या सरकारचा वचकच राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असून केवळ सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा पुरविली जात आहे. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, त्याचे जंगलराज करू नका. आ. प्रज्ञा सातव यांच्या पाठीशी प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींवर पुन्हा हल्ला होणार नाहीत यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावी व आमदार डॉ प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील मास्टरमाईंड ला तातडीने अटक करून अद्दल घडवा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com