राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोलेंच्या वक्तव्यानं राजकीय भूकंप
भंडारा | उदय चक्रधर : भंडारा गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं आहे. भंडारा-गोंदिया जिल्हा परीषदेच्या निकालानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलाताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी ने अनेक ठिकाणी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. आम्ही जयंत पाटील, व प्रफुल पटेल, यांच्या सोबत सुध्दा बोलणं झाल्यावर यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपा सोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सुध्दा राष्ट्रवादी भाजप सोबत जात युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपशी सुरु असलेल्या संघर्षात तिन्ही पक्ष एकत्र असल्याचं दिसत होतं, मात्र आता पुन्हा एकदा अंतर्गत खदखद बाहेर येत असल्याचं पाहायला मिळतंय.
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संताप व्यक्त केल्यानंतर नाना पटोले यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील सरकार धोक्यात येण्याची चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न करत आहे. मालेगाव, भिवंडीत आमचे सिटींग सदस्य राष्ट्रवादीने नेले आहेत. त्यामुळे याबद्दल आम्ही हायकमांडकडे बोलणार असून काय तो सोक्ष-मोक्ष एकदा लागला पाहिजे असं नाना पटोले म्हणाले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता नाना पटोले यांनी अत्यंत टोकाचं विधान केलं असून, त्यामुळे त्यांची आतापर्यंतची एकुणच सगळी नाराजी बाहेर पडली असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, हा प्रकार नाना पटोलेंनी श्रेष्ठींच्या कानावर टाकणार असल्याचं सांगितलं. तसंच ते कायमचा सोक्ष-मोक्ष लावू असं म्हटल्याने येणाऱ्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संबंध बिघडण्याची शक्यता बळावली आहे.