Nana Patole
Nana Patole

"परवानगी घेऊन मोर्चा काढला, तरीही आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करतात"; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Published by :

Nana Patole Press Conference : सरकारच्या विरोधात जो कुणी आंदोलन करेल, त्यांच्याविरोधा अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय फडणवीसांच्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे संविधानातील व्यक्तीस्वातंत्र्य संपवण्याचं काम केलं आहे. अशा कारणांमुळे राज्यघटना धोक्यात आहे, असं आम्ही म्हणतो. इंग्रजांच्या काळातही मोर्चा काढला जात होता. पण आता या लोकशाहीच्या सरकारमध्ये त्यांनी असे कायदे केले आहेत की, तुम्हाला आवाज उठवायचा असेल, तरीही मोर्चा काढता येत नाही. पोलीस तातडीनं गुन्हे दाखल करतात. परवानगी घेऊन मोर्चा काढला, तरीही त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जातात, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत नाना पटोले पुढे म्हणाले, आत्महत्याग्रस्त प्रश्नाबद्दल राहुल देशमुखांनी आंदोलन केलं आणि त्यांना अटक केली. राज्यात आणि केंद्रात या सरकारची हुकूमशाही आणि तानाशाही सुरु आहे. लोकांनी त्यांना उत्तर दिलं आहे, ते ४ जूनला पाहायला मिळेल. "मनोज जरांगे पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी काय बोलावं, शासनाने काय करावं, या गोष्टी शासकीय पातळीवरच्या आहेत. शासन आणि जरांगे पाटील या दोघांचा हा वाद आहे. त्यामुळे आम्हाला या भानगडीत पडायचं नाही. पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं जातं. कोणत्या राज्यात कोणत्या विचारांचं सरकार आहे, हे पाहिलं नाही पाहिजे. प्रधानमंत्री देशाचा असतो. सर्वांना न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे", असंही पटोले म्हणाले.

हिंसाचार झाल्याने लोकांचा जीव जात आहे. लोकांचं जगणं कठीण झालं आहे. लोक तिथून पळून जात आहेत. अशाप्रकारे पश्चिम बंगालमध्ये भयावह स्थिती आहे. नोकरिचं आमिष दाखवून ऑनलाईन एक हजार रुपये घ्यायचे. आयटीच्या नावाखाली भामटे मुलांना आणि पालकांना फसवतात. सरकारच अशा भामट्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे. या आयटी भामट्यांवर तातडीनं कारवाई करावी आणि पालकांना न्याय मिळावा, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com