धावत्या रेल्वेत महिला झाली प्रसूत; दिला गोंडस बाळाला जन्म,रेल्वे कर्मचारी व प्रवाशांनी प्रसंगावधान राखत केली प्रसूती
Admin

धावत्या रेल्वेत महिला झाली प्रसूत; दिला गोंडस बाळाला जन्म,रेल्वे कर्मचारी व प्रवाशांनी प्रसंगावधान राखत केली प्रसूती

गर्भवती असलेली ' ती ' रेल्वे प्रवास करत एक्स्प्रेसने कल्याणला जाण्यासाठी निघाली. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर तिला प्रसव वेदना जाणवू लागल्या.
Published by :
Siddhi Naringrekar

संदीप जेजुरकर, नांदगाव

गर्भवती असलेली ' ती ' रेल्वे प्रवास करत एक्स्प्रेसने कल्याणला जाण्यासाठी निघाली. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर तिला प्रसव वेदना जाणवू लागल्या. तीच्या जिवाची सुरू असलेली घालमेल सहप्रवासी महिला व रेल्वे कर्मचारी यांच्या लक्षात आली. अन् त्यानंतर महिलांनी प्रसंगावधान राखत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची रेल्वेच्या बोगीतील शौचालयाजवळ तिची प्रसूती करण्यात आली. एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला. ही घटना धावत्या ' काशी एक्स्प्रेस ' मध्ये घडली. संजना दत्ता चव्हाण असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. नांदगाव रेल्वे स्थानकात याबाबत कळविण्यात आल्यानंतर रेल्वे विभगाचे डॉ.संदीप ठोके हे रुग्णवाहिका व वैद्यकीय टीमसह हजर झाले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून महिला व तिचे नवजात बालक हे दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण येथील दत्ता चव्हाण व त्यांचे कुटुंबीय हे भुसावळ येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. दत्ता यांची पत्नी गरोदर असल्याने तीस भुसावळ येथील शासकीय रुग्णालय येथे तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर शरीरात रक्त व पाणी कमी असल्याची बतावणी केल्या नंतर चव्हाण कुटुंबीयांनी आपल्या मूळगावी कल्याण येथे जाण्याचे ठरले त्यानुसार भुसावळ रेल्वे स्थानकातून काशी एक्स्प्रेसने चव्हाण कुटुंबीय कल्याणकडे रवाना झाले.भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर दत्ता यांची पत्नी संजना हिस प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पुढे नांदगाव रेल्वे स्थानकावरील डॉक्टर संदीप ठोके यांच्याशी संपर्क करण्यात आला..मात्र त्रास अधिकच वाढत चालल्याने रेल्वे कर्मचारी व रेल्वेतील सह प्रवासी असलेल्या महिलांनी प्रसंगावधान राखत डब्यातील शौचालयाजवळ जावून संजना हीची प्रसूती करण्याचे ठरले आणि त्यानुसार प्रसूती ही करण्यात आली.

दरम्यान, नांदगाव रेल्वे स्थानक येथे संपर्क साधल्यामुळे डॉ.संदीप ठोके यांनी महिला व तिचे नवजात बालक तपासण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा रुग्णवाहिकेसह सज्ज ठेवली. गाडी नांदगाव रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर या टीमने महिला व बालकाची तपासणी करत ते दोघेही सुखरूप असल्याचा निर्वाळा दिला. तसेच नांदगाव येथील दवाखान्यात थांबण्याबाबत चव्हाण कुटुंबियांना विनंती केली. मात्र दोघेही सुखरूप असल्याने त्यांनी पुढे कल्याणकडे जाण्याचा निर्णय घेत काशी एक्सप्रेसने पुढचा प्रवास सुरू केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com